गडचिरोली- जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा परवाना काढून भाजीपाल्याच्या वाहनातून चक्क सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात होती. जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी अशाच एका वाहनातून ८० हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू सोमवारी जप्त केली आहे.
भाजीपाल्याच्या वाहनातून सुगंधित तंबाखूची वाहतूक; पोलिसांकडून 80 हजाराच्या मालासह वाहन जप्त
कोरची पोलिसांनी भाजीपाल्याच्या वाहनातून सुगंधित तंबाखू वाहतूक केल्याप्रकरणी चारचाकी वाहन जप्त केले आहे. या वाहनातून 80 हजार रुपायंची सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. पोलिसांना भाजीपाल्याच्या वाहनातून सुंगधी तंबाखूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.
देसाईगंज येथील भाजीपाला व्यापारी लकी उर्फ लंकेश हटनागर हा आपल्या एम.एच.३६-एए३९९ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून राजनांदगाव येथून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. ही माहिती मिळताच कोरची पोलिसांनी नाकेबंदी करुन वाहन अडविले. यावेळी वाहनातून ८० हजार रुपये किमतीचा ‘ईगल’ व ‘मजा’ नामक सुगंधित तंबाखू जप्त केली. शिवाय ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनही ताब्यातही घेण्यात आले आहे.
कोरची पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपवले आहे. याप्रकरणी वाहनधारकाची कसून चौकशी केली तर सुगंधित तंबाखूचा व्यापार करुन मोठी रक्कम कमविणारे अनेक मोठे व्यापारी गळाला लागू शकतात. देसाईगंज व आरमोरी ही दोन शहरे सुगंधित तंबाखूच्या तस्करीची केंद्रे आहेत.