गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसला, तरी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना निर्मूलनासाठी सर्व नागरिकाने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे व आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सीलमवार यांनी केले आहे. तसेच गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी भेटी देत नागरिकांना दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, भामरागड पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप भांड, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज जाधव आदी उपस्थित होते.
कोरोना खबरदारी : संचारबंदीमध्ये कोणीही बाहेर पडू नये, भामरागडमध्ये पोलिसांचे आवाहन
जगभरात तसेच देशात व राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळेच गडचिरोलीत देखील संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भामरागड नगर ते गाव खेड्यापर्यंत ध्वनीफितीद्वारे गावोगावी, प्रत्येक वार्डात दक्षता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. संचारबंदी दरम्यान भामरागड पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि विनाकारण फिरणाऱ्यांना चोप दिला आहे. त्यामुळे नागरिक घरीच राहणे पसंत करीत आहेत.
भामरागड शहरात शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. मात्र, गामीण भागात बाहेरून येणाऱ्यांची संख्या २५० च्या वर पोहोचली आहे. शिक्षकांमार्फत सर्वेक्षण सुरू असून ३५० ते ४०० पर्यंत जिल्हा व राज्याबाहेरून दाखल झालेल्या लोकांच्या यादीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या भामरागड, ताडगाव, लाहेरी, कोठी, नारगुंडा व धोडराज या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे.