गडचिरोली- कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे नक्षलींनी ३६ वाहने जाळली होती. यानंतर १ मे २०१९ ला म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे १५ जवान, १ खासगी वाहन चालक हुतात्मा झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारांपैकी एक असलेला नक्षलवादी दिनकर गोटा याला त्याची पत्नी सुनंदा कोरेटीसह गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
नक्षलवादी दिनकर गोटा हा २००५ मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. यानंतर वर्ष २००६ मध्ये चातगाव दलम, २००७ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी मेंबर, २००८ मध्ये धानोरा दलममध्ये कमांडरपदी कार्यरत, २०११ मध्ये टिपागड दलमचा एरिया कमिटी सचिव, २०१६ पासून कोरची दलममध्ये उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर तो कार्यरत होता. तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात त्याची पकड होती.
दिनकर गोटा याच्यावर गडचिरोली पोलीस ठाण्यात एकूण १०८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात ३३ खुनांचा समावेश आहे. त्याचबरोबर २००९ मध्ये मरकेगाव चकमकीत त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व १ मे २०१९ ला जांभूळखेडा येथे भूसुरुंग स्फोट घडवण्यात तो मुख्य सूत्रधार आहे. या ठिकाणांची रेकी व नियोजनामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तर, नदाली सुनंदा कोरेटी ही २००९ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाली. सध्या ती नक्षलवाद्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकूण ३८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.