महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवाद्यांची जाळपोळ; गडचिरोलीत पेटविले चार ट्रॅक्टर

एटापल्ली तालुक्यातील पुस्के येथील रस्त्याच्या कामावर असलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली

गडचिरोली नक्षली हल्ला

By

Published : Mar 13, 2019, 11:34 PM IST

गडचिरोली- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ११ एप्रिलला गडचिरोलीत मतदान होणार आहे. एटापल्ली तालुक्यातील पुस्के येथील रस्त्याच्या कामावर असलेले चार ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.


ऐन निवडणुकीच्या तोंडावर नक्षली कारवाया रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासुन जवळपास २५ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पुस्के येथे रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास १२ ते १५ नक्षल्यांनी गावात दाखल होत ४ जॉन डिअर ट्रॅक्टर्सची जाळपोळ केली. दोन दिवसांपूर्वी याच गावात एका रोडरोलरला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न नक्षल्यांनी केला होता.


लोकसभा निवळणुकीकरता आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. रविवारी कोरची तालुक्यातील कोटगुल पोलीस मदत केंद्रांतर्गत ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत कार्यरत एका कंत्राटी शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. येत्या निवडणुकीत नक्षली कारवायात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासनासाठी नक्षली कारवाया रोखणे मुख्य आव्हान बनले आहे. सदरील बांधकामाचे कंत्राट अहेरी येथील सतीश मुक्कावार यांचे असून नक्षल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील ग्रामीण भागात भीती निर्माण झाल्याचे मुक्कावार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details