गडचिरोली - दक्षिण गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगाणा सरकारने मेडीगट्टा बॅरेज उभारला आहे. मात्र, या प्रकल्पाच्या बांधकामात 1 हजार कोटींचा घोटाळा झाला. कुठलीही परवानगी घेतलेली नसताना महाराष्ट्रातील मुरूम उत्खनन केले जात आहे. या प्रकल्पाचे पाणी अडवल्याने सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे तेलंगाणा सरकारकडून ही नुकसान भरपाई वसूल करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
मेडीगट्टा सिंचन प्रकल्प गतवर्षी पूर्ण झाला. घाईघाईत या प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांच्या जमिनींचे अगोदर भूसंपादन करणे गरजेचे होते. मात्र, असे न करता तेलंगाणा सरकारने प्रकल्पाचे उद्घाटन करून पाणी अडवले. परिणामी अनेकांच्या शेतात पाणी शिरुन रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.