गडचिरोली - भामरागड तालुक्यातील नागरिक 20 एप्रिलला लॉकडाऊन संपला असा गैरसमज झाल्यानंतर भामरागडकडे मोठ्या संख्यने दुचाकीने निघाले होते. ही बाब लक्षात येताच येथील तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवणे आणि नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज जाधव यांनी तातडीने त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतला. नागरिक पर्लकोटा नदीजवळ दाखल झाले असता, प्रत्येकाचे वाहन थांबवण्यात आले. तसेच त्यांचा गैरसमज दूर करून 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार असल्या संदर्भात मार्गदर्शन केले.
भामरागडात 22 मार्चपासून संचार बंदी आहे. 20 तारखेला लॉकडाऊन संपले, असा त्यांना गैरसमज झाला. पुढील शासनाच्या निर्णयासंदर्भात येथील ग्रामीण भागात माहिती मिळाली नाही. याठिकाणी फोनसेवा नाही. यामुळे अशा तालुक्यातील 128 गावातील 80 टक्के गावकऱ्यांना जगात काय होत आहे, याबद्दल माहिती नाही. हा भाग दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. अशा परिस्थितीत 20 एप्रिलला लॉकडाऊन संपले, या आशेने भामरागडकडे येऊ लागले. वाढती दुचाकींची गर्दी लक्षात येताच पोलीस विभाग प्रमुख एसडीपीओ, तहसीलदार आणि मुख्याधिकारी तातडीने भामरागड नगर प्रवेश नाक्याजवळ पोहोचले.