महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली : महिलांनी जंगलात भर पावसात पाठलाग करून पकडला दारूने भरलेला ट्रॅक्टर

महिलांनी भर पावसात जंगलामध्ये गाडीचा पाठलाग केला. महिला पाठलाग करत असल्याचे पाहताच ट्रॅक्टरवरील सर्व जण दारूने भरलेला ट्रक्टर तेथेच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले.

दारूने भरलेला ट्रॅक्टर

By

Published : Jul 5, 2019, 1:54 PM IST

गडचिरोली- दारूबंदी असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलिसांसह गावातील महिलांच्या संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मुरूमगावातील महिलांनी गुरुवारी दारूने भरलेला ट्रॅक्टरचा पाठलाग करत लाखो रुपयांची दारू पकडली आहे.

महिलांनी पकडला दारूने भरलेला ट्रॅक्टर

मुरुमगावात दारूविक्रीला बंदी आहे. गावात मुक्तीपथचे गावसंघटन स्थापन झाले असून महीला दररोज गावात दारूविक्रेत्यांवर लक्ष ठेवत असतात. तरीदेखील गावात दारू विक्रीस येते. हे लक्षात आल्यावर महिलांनी दारूची पाळेमुळे शोधण्याचे ठरवले. बुधवारी रात्री एक पांढरी पीकअप गाडी आणि ट्रक्टर संशयास्पद वाटली. त्यामुळे महिलांनी दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी जवळच्या रीडवाही उमरपालच्या जंगलाच्या दिशेने नेली.

महिलांनी भर पावसात जंगलामध्ये गाडीचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे पाहताच सर्वजण दारूने भरलेला ट्रक्टर तेथेच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले. याबाबतची माहिती महिलांनी पोलिसांना दिली. मात्र, पोलीस न आल्याने महिलांनीच रात्रभर या दारूला पहारा देण्याचे ठरवले. पंरतु, पाऊस जास्त असल्याने त्या पहाटे घरी गेल्या आणि यानंतर पुन्हा सकाळी पोलीस येईपर्यंत घटनास्थळी पोहोचून थांबल्या होत्या.

सकाळी दारू साठ्याकडे महिला गेल्या असता, दारू पीकअपमध्ये पुन्हा भरून नेत असल्याचे त्यांना दिसले. याचाही विरोध करत महिलांनी दुसऱ्यांदा दारू नेण्याचा डाव हाणुन पाडला. यावेळी चालकाने महीलांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रतिकाराने चालक पळून गेला. मुरुमगाव पोलीस मदत केंद्राने सकाळी पकड्लेल्या दारू व वाहनाचा पंचनामा केला.

महिलांनी तब्बल २ हजार ७३० दारूच्या बाटल्यांचा साठा पकडला. यावेळी सरपंच प्रियांका कुंजाम, सायरा शेख, प्रतिभा उइके, अविका आचला, नीरजा कुंजाम, आसोबाई पिद्दा, अनारबाई पिद्दा, लिलाबाई भुरकुरीया, बुधाबाई भोयर, पुश्पाबाइ कारेवार, शहीदा पठाण, मुनीर शेख, संगीता पोया यांसह मुक्तिपथ गावसंघटनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details