महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा द्या', ग्रामसभांचा एल्गार

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी ५० ग्रामसभांनी बुधवारी आंदोलन सुरू केले आहे.

ग्रामसभांचे आंदोलन

By

Published : Feb 21, 2019, 2:49 PM IST

गडचिरोली - अतिदुर्गम तसेच विकासापासून कोसो दूर असलेल्या धानोरा तालुक्यातील पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा, या मुख्य मागणीसह इतर ६४ मागण्यांसाठी परिसरातील ५० पेक्षा जास्त ग्रामसभांनी बुधवारी आंदोलन सुरू केले आहे. गावात ठिय्या आंदोलन आणि चक्काजाम करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया

बुधवारी परिसरातील ५० पेक्षा अधिक ग्रामसभांनी मिळून पेंढरी येथे आंदोलन केले. त्यानंतर गडचिरोली मार्ग रोखून चक्काजाम करण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी केले नाही. तर सर्व ग्रामसभांच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला होता. बुधवारपासून ग्रामसभांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले असून हे आंदोलन प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही तो पर्यंत सुरूच राहणार, असल्याचे ग्रामसभांच्या अध्यक्षांनी सांगितले. या आंदोलनासाठी परिसरातील जवळपास ३ हजार नागरिक स्वयंपुर्तीने पेंढरी येथे दाखल झाले. सर्व ग्रामसभांनी आंदोलनासाठी पेंढरी येथे तळ ठोकला असून येथे स्वयंपाकाचे साहित्यही जमा केले आहे.

पेंढरी हे गाव दुर्गम परिसरात असल्याने येथे दळणवळणाच्या साधनांची कोणतीही सोय नाही. त्यामुळे पेंढरी गावाला तालुक्याचा दर्जा देऊन परिसरातील नागरिकांची गैरसोयी दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात चक्काजाम, बाजारपेठ व शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार आहे. हे आंदोलन ४ दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतरही दखल न घेतल्यास २४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर मोर्चेकरी साखळी उपोषणाला बसणार आहेत. यानंतरही प्रशासनाने प्रतिसाद न दिल्यास १ मार्चपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details