गडचिरोली - जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील करेमरका परिसरातील दहा गावांना जोडणाऱ्या नाल्यावर गडचिरोली बांधकाम विभागाच्या अभिनव संकल्पनेतून 'ब्रिज कम बंधारा' उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे दहा गावात जाण्यासाठी वाहतूक सुलभ झाली आहे. शिवाय परिसरातील शंभर एकर शेतीही आता सिंचनाखाली आली आहे.
गडचिरोली-छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्गापासून उजवीकडे घनदाट जंगलात करेमरका हे गाव वसले आहे. या गावाच्या परिसरात इतर 10 गावे आहेत. मात्र, नाल्यामुळे येथील गावांचा दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटतो. त्यामुळे गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत या नाल्यावर नाबार्डच्या माध्यमातून ब्रिज कम बंधाऱ्याचे बांधकाम करण्याची अभिनव संकल्पना आखली.
या ब्रिज कम बंधाऱ्यासाठी शासनाने नाबार्ड योजनेतून 4 कोटी 37 लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून 60 मीटर लांबी व 2.4 मीटर खोलीचा बंधारा निर्माण झाला आहे. या बंधाऱ्यामुळे तीन ते चार किलोमीटर पर्यंत पाणी अडून आहे. अडलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी तसेच लगतच्या पाणीपुरवठा योजनेसाठी करण्यात येणार आहे. बंधाऱ्याला पाच मीटरचे 12 आर्च टाईप गाळे बांधण्यात आले. त्यांची उंची अडीच मीटर इतकी आहे. गुरुवारी या बंधाऱ्याचे गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी कनिष्ठ अभियंता भालचंद्र वासेकर यांनी पुढाकार घेतला. तर बांधकामादरम्यान नक्षलवाद्यांची भीती असतानाही कंत्राटदार मंगेश देशमुख, अजय गोरे यांनी वेळेत काम पूर्ण केल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -सर्व्हेक्षण होत राहील आधी पूरग्रस्तांना आर्थिक मदत द्या - फडणवीस