गडचिरोली- रताळे म्हटले की फक्त उपवासाला खाल्ले जाणारे कंदमुळ होय. मात्र, एवढीच त्याची ओळख नसून ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, आणि त्यापासून विविध खाद्यपदार्थ देखील बनवता येतात. मुलचेरा तालुक्यातील लभानतांडा हे गाव रताळे उत्पादनासाठी ओळखले जाते. मात्र, रताळ्याला योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कवडीमोल भावाने पीक विकण्याची परिस्थिती उद्भवली आहे.
१९६० साली लभानतांडा या गावाची स्थापना झाली होती. त्यावेळी आंध्रप्रदेशातून स्थलांतरण करून आलेले नागरिक या गावी स्थायिक झाले होते. भटकंती करून चरितार्थ चालविणे हाच येथील नागरिकांचा व्यवसाय होता. कालांतराने येथील नागरिकांनी अतिक्रमण करून शेती करायला सुरुवात केली. दरम्यान, शासकीय योजनांचा कुठलाही लाभ मिळत नसताना देखील ग्रामस्थांनी रताळे लागवडीला सुरुवात केली. त्यांनी उत्पादन केलेल्या रताळ्यांना आज चांगली मागणी आहे. त्यामुळे, जिल्ह्यात रताळे लागवड करणारा एकमेव गाव म्हणून लभानतांडाची ओळख आहे.