गडचिरोली - सर्च (शोधग्राम) येथे २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या तब्बल ८५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान रुग्णांसह त्यांच्या नातलगांचीही संपूर्ण व्यवस्था शोधग्राममध्ये करण्यात आल्याने रुग्णालयाला ट्रायबल व्हिलेजचे स्वरूप आले आहे. सांगली, कोल्हापूर कराड, पुणे, फलटण, मुंबई येथील डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या.
माँ दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेता नियमितपणे शिबिरे घेतली जातात. गर्भाशय विकार, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल यासह इतरही विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी २८ ते ३० मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात अपेंडिक्स आजाराच्या ५, हर्निया १२, हायड्रोसिल १० अंगावरील गाठी २० आणि मुत्रखडा विकाराची १ शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर गर्भापिशवीशी संबंधित आजाराच्या २० शस्त्रक्रिया यावेळी पार पडल्या.
डॉ. रवींद्र वोरा यांच्या मार्गदर्शनात डॉ. संजय शिवदे, डॉ. संजय पुरोहित, डॉ. अजित गुर्जर, डॉ. संपत वाघमारे, डॉ. शिंत्रे, डॉ. गौतम पुरोहित, डॉ. मीना अग्रवाल, यांनी शस्त्रक्रिया केल्या. डॉ. किरण भिंगार्डे, डॉ. राजा पाटील, डॉ. शरयू बेलापुरे, डॉ. अपर्णा पुरोहित डॉ. अनिल सालोक आणि डॉ. शिल्पा मलिक यांनी भूलतज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळली. नागपूर, यवतमाळ, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डीएमएम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ आणि काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.