धुळे- भावाच्या निधनानंतर दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजात एक आदर्श ठेवला आहे. हा विवाह सोहळा धुळे तालुक्यातील कापडणे येथे झाला. सामाजिक परंपरांना फाटा देत झालेला हा विवाह सोहळा सध्या धुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
विधवा वहिनीशी लग्न करून दिराने घालून दिला आदर्श
धुळे तालुक्यातील कापडणे येथील गणेश बोरसे याचा विवाहानंतर अवघ्या काही वर्षातच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. यानंतर त्याच्या विधवा पत्नीशी दिराने विवाह करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
धुळे तालुक्यातील कापडणे येथील गणेश बोरसे याचा विवाहानंतर अवघ्या काही वर्षातच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृत गणेशच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ तसेच विधवा पत्नी रोहिणी व २ वर्षांचा मुलगा आरव असा परिवार आहे. गणेशच्या निधनानंतर त्याच्या पत्नीवर झालेला आघात कधीही भरून न निघणारा असल्याची जाणीव बोरसे परिवाराला झाली. यातूनच तरुण विधवा सून व मुलगा आरव यांची चिंता बोरसे कुटुंबीयांना सतावत होती.
बोरसे कुटुंबाने समाजाच्या रितीरिवाजांना फाटा देत लग्नाबद्दलच्या भावना चेतन व विधवा सून यांच्याकडे बोलून दाखवल्या. त्या दोघांना लग्नासाठी राजी करण्यात आले. बोरसे परिवाराने निवडक नातलगांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातीलच मंदिरात लग्न सोहळा पार पाडला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरसे, सुरेश बोरसे, माधवराव बोरसे, दगाजी बोरसे, शुभम बोरसे, कैलास बोरसे व नातेवाईकांनी विशेष प्रयत्न केले.