धुळे - नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे घडली. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच धुळे तालुक्यातील धामणगाव येथील एका शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे. शरद पाटील असे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आलेला नव्हता.
हेही वाचा -VIDEO : नाशकात वाहतूक पोलिसाची ज्येष्ठ नागरिकाशी अरेरावी
धुळे तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या बोरी नदीच्या जवळ कौशल्या कैलास सोनवणे, छाया देवा सोनवणे, सविता खंडू सोनवणे हे नेहमीप्रमाणे बोरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पावसाचे वातावरण असल्याने संततधार सुरु होती. अचानक वातावरणात गारवा निर्माण झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. यामुळे या तिघी कपडे धुण्याचे काम आटोपून घराकडे परतत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्या तिघांना गंभीर दुखापत झाल्याने त्या बेशुध्द पडल्या. त्या बेशुध्द पडल्याचे गावातील समाधान परशुराम सोनवणे यांनी पाहिले असता या तिघींना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आणि सविता हिला आर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.