धुळे- जिल्ह्यातील शिरपूर येथील सूतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारांच्या रिक्षाला कंटेनरने दिलेल्या धडकेत 3 महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 कामगार जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या गोल्डन फॅक्टरीजवळ झाला आहे. यामधील जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे : महिला कामगारांच्या रिक्षाला कंटेनरची जोरदार धडक; ३ महिला जागीच ठार
जिल्ह्यातील शिरपूर येथील सूतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारांच्या रिक्षाला कंटेनरने दिलेल्या धडकेत 3 महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कल्पनाबाई दगा कोळी (वय 41, शिरपूर), प्रमिलाबाई तुकाराम अहिरे ( वय 60, शिरपूर) आणि लक्ष्मीबाई रमेश मराठे ( वय 35, शिरपूर) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर ज्योती दगा कोळी, सुनील पावरा, नरेंद्र दगा मराठे, कविता दगडू अहिरे, आणि सुदामसिंग पदमसिंग राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर येथील सूतगिरणीत काम करणाऱ्या कामगारांना नेण्यासाठी कारखान्याची गाडी येते. मात्र, कामगारांची गाडी सुटल्यामुळे हे कामगार (एमएच-18-डब्ल्यू-8708) क्रमांकाच्या रिक्षामधून सूतगिरणीकडे जात होते. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील गोल्डन फॅक्टरीजवळ रिक्षा आली असता भरधाव वेगात जाणाऱ्या (एमएच-46- एएफ- 7228) क्रमांकाच्या कंटेनरने रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षातील 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 कामगार जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने कंटेनरवर दगडफेक केली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.