धुळे - जिल्ह्यात मोठया प्रमाणावर पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. शहरातील मोहाडी भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी धुळे महापालिकेत निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. याबाबत नागरिकांनी अभियंता कैलास शिंदे यांना जाब विचारला.
धुळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे महापालिकेत आंदोलन
पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी धुळे महापालिकेत निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला.
शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन भाजपच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या वेळी देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासन सत्ताधारी पक्षाने अद्याप पूर्ण केलेले नाही. शहरातील विविध भागात भर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील मोहाडी भागात म्हाडाची १५० घरे आहेत. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी धुळे महापालिकेत निदर्शने केली. यावेळी नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला.
नागरिकांनी महापालिकेचे अभियंता कैलास शिंदे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून त्यांना याबाबत जाब विचारला. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.