धुळे- महापालिकेतर्फे शहरवासीयांना पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची सुविधा देण्यात येते. यासाठी पालिकेकडून पाणीपुरवठा व पथदिवे यांच्यासह इतर उपकरणे चालवण्यासाठी दर महिन्याला एकूण 1 कोटी 75 लाख रुपये वीजबिल भरते. प्रशासनाचा हा खर्च कमी करण्यासाठी महापालिकेने सौर उर्जा वापराचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने पाणीपुरवठा केंद्राची जागा आणि महानगरपालिका नवीन इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे.
४० टक्के वीज अपारपरिक स्त्रोतातून-
शहराबाहेरील व शहरातील पाणीपुरवठा केंद्राच्या जागेवर त्याप्रमाणे मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. महापालिकेच्या तापी पाणी योजनेवरील सुकवद व बाबळे तसेच डेडरगाव पाणी पुरवठा केंद्र व मनपा इमारतीच्या छतावर सौर सयंत्र बसवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी ऑन ग्रीड सिस्टीम बसवल्यास अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातून वीज निर्मिती होऊन मनपाला उपभोगातून टप्प्याटप्प्याने किमान 40 टक्के वीज निर्मिती करून ती ऑन ग्रिड सिस्टीमने वापर करू शकते.
नाबार्ड किंवा केंद्राची मदत-
महापालिका सद्यस्थितीत सुकवद बाभळे हनुमान टेकडी मालेगाव रोड पांझरा वॉटर बडगुजर जलकुंभ व पाणीपुरवठा केंद्राचे दर महिन्याला वीज बिल सुमारे एक कोटी 25 लाख रुपये आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील पथदिव्यांची वीज बिल 35 लाख रुपये असून इतर देयकांचे बिल 15 लाख आहे. याद्वारे एकूण महापालिका महावितरण कंपनीला एक कोटी 78 लाख वीज बिल महिन्याला देत आहे. त्याकरिता सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यास वीज बिलात 40 टक्के बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन राज्य शासन तसेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्याकडून मार्गदर्शन परिपत्रकानुसार काही प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. तसेच नाबार्डकडून किंवा केंद्रशासनाच्या सोलर मिशन उपक्रमाअंतर्गत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याच पद्धतीने खासगी भागीदारी तत्त्वावर ही मनपा हा उपक्रम सुरू करू शकते.
अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची केली आहे तरतुद
महापालिकेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. याकरिता लवकरच महापालिका प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार समितीची नियुक्ती करणार आहे. या प्रकल्पासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मनपा इमारतीवर होईल पाचशे केव्ही वीज निर्मिती
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प करण्यात येणार आहे. इमारतीच्या छतावर पाचशे किलो वॅट वीज निर्मिती होणार आहे. तरी इमारतीसाठी पूर्णपणे सध्या 250 किलो वॅट वीज मंजूर केली आहे. मात्र त्याचा पूर्णपणे वापर होत नाही.