धुळे - शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संदर्भात कुठलीही उपचार यंत्रणा उभारली नाही. विलगीकरण कक्ष नाही. औषधोपचाराची व्यवस्था नाही. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर सांगळे यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला. तसेच जिल्हा रुग्णालयात आवश्यक यंत्रणा युद्धपातळीवर उभी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
जुन्या जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्ष फक्त कागदावरच; आरोग्य अधिकाऱ्यांना सेनेचा घेराव
शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत सुरू असलेल्या शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संदर्भात कुठलीही उपचार यंत्रणा उभारली नाही.
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणा हायअलर्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांना कोरोना संदर्भात आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याचे आणि या आयसोलेशन वॉर्ड अर्थात विलगीकरण कक्ष तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात यापैकी कुठलीही व्यवस्था नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली तसेच सिव्हिल सर्जन डॉक्टर सोमनाथ सांगळे यांना घेराव घातला. डॉ. सांगळे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला, जिल्हा रुग्णालयात आवश्यक यंत्रणा युद्धपातळीवर उभी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या यंत्रणा संदर्भात डॉक्टर सांगळे यांना विचारणा केली असता त्यांनी यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे शिवसेना स्टाईलने त्यांना समज दिली जाणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील यांनी दिली.