धुळे- बारा बलुतेदारांच्या मागण्यांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी कार्यालयात फिरविले. मात्र, निवेदनच स्वीकारले नाही. यामुळे वैतागलेल्या हिरामण गवळी व पदाधिकान्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडला.
कोरोनामुळे सध्या देशभरात उद्भवलेल्या स्थितीमुळे शासनाने लॉकडाउन जाहीर केले आहे. यामुळे बारा बलुतेदारांच्या उद्योग व्यवसायांवर गदा आली आहे. या बारा बलुतेदारांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी आज दुपारी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष दिनेश बागूल व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.
भाजप पदाधिकाऱ्याचे ठिय्या आंदोलन हेही वाचा-मंगळवारी पाहता येणार 'सुपर पिंक मून', खगोलप्रेमींना पर्वणी
अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याकरता पदाधिकाऱ्यांना फिरविले-
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे निवेदन देण्यास सांगितले. हिरामण गवळी व बागूल निवासीउपजिल्हाधिकारी संजय यांच्या केबिनमध्ये गेले असता त्यांनी उपजिल्हाधिकारी व्हाण यांच्याकडे निवेदन द्या, अशी सूचना केली. तेथून हिरामण गवळी व बागूल उपजिल्हाधिकारी चव्हाण यांच्याकडे निवेदन देण्यास गेले असता त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देत ते निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्याकडेच देण्यास सांगितले. तेथून गवळी व बागूल पुन्हा संजय गायकवाड यांच्याकडे गेले असता संजय गायकवाड यांनी गवळी व बागूल यांना तुमचे निवेदन स्वीकारणार नाही, तुम्ही बाहेर थांबा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करू, असे सांगितले. गवळी यांनी आम्ही वैयक्तिक कारणासाठी निवेदन देण्यास नाही, तर बारा बलुतेदारांच्या न्याय मागण्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो आहोत. मात्र, ते स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती करा, असे संतप्त होऊन सांगत गवळी व बागूल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्या केबिनबाहेरच ठिय्या मांडला.
हेही वाचा-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी #mahacovid मोहीम!
शहर पोलिसांना पाचारण -
यानंतर प्रशासनातर्फे पोलिसांना पाचारण करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांची भेट घेत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी गवळी यांच्याशी चर्चा करत त्यांना वाहनातून शहर पोलिस ठाण्यात नेले. तेथे दुपारी उशिरापर्यंत देशमुख व गवळी यांच्यात चर्चा सुरू होती. यात गवळी यांना समजावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.