महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉक्टरांच्या उपयोगात येणाऱ्या किओस्कची निर्मिती; धुळ्यातील अभियंत्याची कामगिरी

धुळ्यातील कोरोना वॉरियर अभियंता संग्राम लिमये यांनी तयार केलेल्या कोरोना स्वॅप किऑस्कचे ( बंदिस्त काचेची केबिन ) भारतीय लष्कराच्या बिहारमधील दारुगोळा कारखान्यामध्ये उत्पादन घेतले जाणार आहे.

By

Published : Apr 18, 2020, 5:54 PM IST

धुळे- कोरोना रुग्णांची तपासणी करताना आणि त्यांच्या घशातील द्रवाचा नमुना घेताना डॉक्टर्सना अतिशय काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे, ही बाब ध्यानात घेऊन धुळ्यातील कोरोना वॉरियर अभियंता संग्राम लिमये यांनी तयार केलेल्या कोरोना स्वॅप किऑस्कचे ( बंदिस्त काचेची केबिन ) भारतीय लष्कराच्या बिहारमधील दारुगोळा कारखान्यामध्ये उत्पादन घेतले जाणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या भारतासह संपूर्ण जगभरात एक प्रकारचे नैराश्य पसरले आहे. जगातील अन्य प्रगत देशांपेक्षा भारताची स्थिती सध्या चांगली असली तरीदेखील काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सध्या आपण सर्व घरातच असलो तरीही डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारी अविरत कष्ट करीत आहेत. त्यातही डॉक्टर्सची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. कारण संशयितांच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने घेणे, त्यांची चाचणी करणे, कोरोनाबाधित आढळल्यास त्याचे विलगीकरण आणि उपचार करणे अशी अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सध्या आहे. त्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई सूट परिधान करूनच काम करावे लागते.

देशात पीपीई कीटचा पुरेसा साठा असल्याचे सरकारने सांगितले असले तरिही बऱ्याचदा त्यांचा पुरवठा होण्यास विलंब होतो. त्यासंदर्भात एका इंग्रजी दैनिकात कोरोनाच्या संशयित रुग्णांचे घशाचे स्वॅब घेण्यासाठी एक किऑस्क ( बंदिस्त काचेची केबिन ) तयार करण्यात आल्याचे वृत्त अभियंता संग्राम लिमये यांच्या वाचनात आले. तिन्ही बाजूंनी बंदिस्त असलेल्या या किऑस्कमुळे डॉक्टर व रुग्ण यामध्ये पुरेसे अंतर राखणे शक्य होते. त्यामुळे डॉक्टर्सना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो. त्याची किंमत सुमारे ९९ हजार रूपये असल्याचे समजले. मात्र, संग्राम लिमये हे स्वत: स्थापत्त्य अभियंता असल्याने त्यांनी किऑस्कचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याची निर्मिती कमीत कमी किमतीत धुळ्यातच करणे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्याची निर्मिती केली आणि धुळ्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयास ते किऑस्क भेट दिले.

भारतीय लष्कराने घेतली दखल -

या किऑस्कचे छायाचित्र आणि चित्रफित लिमये यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती आणि ती मोठ्या प्रमाणावर व्हायरलदेखील झाली. अखेर ती पोहोचली बिहारमधील नालंदा येथे असलेल्या भारतीय लष्कराच्या दारुगोळा कारखान्याच्या (ऑर्डिनन्स फॅक्टरी) महाव्यवस्थापकांपर्यंत. योगायोगाने ते महाव्यवस्थापक मराठीच, त्यांच्या एका व्हॉट्सअॅप समुहात हे त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी आपल्या अन्य एका मराठी सहकाऱ्याच्या मदतीने संग्राम लिमये यांच्याशी संवाद साधला आणि दारुगोळा कारखान्यामध्ये सदर किओस्कची निर्मिती करण्याची तयारी दाखविली. किओस्कचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे अशीच लिमये यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी किऑस्कचा आराखडा (डिझाईन) दारुगोळा कारखान्यास दिला.

आता या कारखान्यामध्ये सदर किऑस्कचे उत्पादन केले जाणार असून बिहारमधील रुग्णालयामध्ये ते पुरवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या देशभरात विविध ठिकाणी असलेल्या दारुगोळा कारखान्यांनादेखील हा आराखडा दिला जाणार असून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आता शक्य होणार आहे. किऑस्कसोबत जीवरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या डॉक्टर्ससाठी अतिशय महत्त्वाचे असलेले इन्ट्यूबेशन बॉक्स हे लहानसे उपकरणदेखील कमीत कमी किमतीत कसे बनवता येईल, याचा आराखडा बनवून देण्याची मागणी दारुगोळा कारखान्यातर्फे करण्यात आली आहे.

किऑस्कचे जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादन व्हावे. आम्ही तयार केलेल्या किऑस्कची किंमत केवळ ४५ हजार रूपये आहे. ज्याप्रमाणे भारतीय लष्कराने त्याची बिहारसाठी निर्मिती करण्यास पुढाकार घेतला आहे, तसाच पुढाकार जर केंद्र व राज्य सरकार, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या यांनी घेतला तर त्याची किंमत आणखी कमी होणे आणि देशभरात अगदी लहानातल्या लहान गावापर्यंत किऑस्क पोहोचविणे शक्य होणार आहे. त्याचा आराखडा बनविण्यामागे आमचा कोणताही आर्थिक स्वार्थ नाही. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी झटणारे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती असलेली एक जबाबदारी यातून त्याची निर्मिती आम्ही केली आहे, अशी प्रतिक्रिया लिमये यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details