धुळे -नवजात बालक हे फक्त आपल्या आईजवळच शांत झोपते किंवा तिच्या आवाजाने शांत राहते. मात्र, आईजवळही रडणाऱ्या बालकाला चक्क डॉक्टरांनी गाणे म्हणून काही वेळातच शांत करत झोपी घातले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
शहरातील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नवजात शिशू दाखल झाले. परंतु ते बाळ खूप रडत होते. काही केल्या रडणे थांबवत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी हताश झाले होते. हे बघत बालरोग तज्ज्ञ डाॅ. अभिनव दरवडे यांनी या बाळाला आपल्याजवळ घेत एका वेगळ्या खोलीत त्या नावजात शिशूला हिंदी चित्रपटातील एक सुमधूर गाणे ऐकवले. गाणे ऐकवताच ते नवजात शिशू एकटक डॉ. दरवडे यांच्याकडे बघू लागले व शांत झाले. हळू-हळू त्या बाळाला झोप येऊ लागली आणि ते बाळ झोपी गेले. हे बाळ झोपी गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गीत गाताना डाॅक्टर आपल्या मधुर आवाजासह वात्सल्य प्रेम व्यक्त करत असल्याने हे कमी वजनाचे बाळ शांत झोपले. सेवेला जेव्हा समर्पण प्राप्त होते, तेव्हा मिळणारा आनंद किती अनमोल असतो हे या व्हिडिओतून दिसून येत आहे.