चंद्रपूर - जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर त्याचे नेमके काय परिणाम झाले, याचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार एक समीक्षा समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल येत्या एक महिन्याच्या आत सादर करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सत्तांतर होताच जिल्ह्यातील दारूबंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. ही दारूबंदी चांगली की वाईट यावर मतमतांतरे आहेत. मात्र, याची समीक्षा करण्याचे पाऊल राज्याचे पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उचलले. त्यानुसार त्यांनी तत्काळ ही समिती नेमण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. ही समिती आपला अहवाल येत्या एक महिन्यात तयार करण्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सोबतच जी माहिती या अहवालात समोर येईल ती कॅबिनेटमध्ये मांडली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.