चंद्रपूर - एरव्ही पर्यटकांसाठी हाऊसफुल असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज (बुधुवार) मात्र सर्वत्र सामसूम होती. कोरोनातील टाळेबंदीच्या काळात तब्बल 105 बंद असलेले ताडोबा आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, बफर क्षेत्राच्या 13 प्रवेशद्वारापैकी केवळ दोन प्रवेशद्वारातून वाहने निघाली. कारण त्याच्या बुकिंगला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. एकूण 22 पर्यटक हे ताडोबा सफारीत सहभागी झाले.
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा केवळ देशातिलच नव्हे तर विदेशातही पर्यटकांनाही खुणावत असतो. वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे येथे हमखास वाघाचे दर्शन होते, अशी ख्याती या प्रकल्पाची आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी नेहमीच ताडोबा हाऊसफुल्ल असते. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि 18 मार्चपासून ताडोबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला मोठा फटका बसला. ताडोबा परिसरात असलेले रिसॉर्ट, जिप्सीचालक, गाईड, कुटीर उद्योग यांचा रोजगार थांबला. त्यामुळे हे पर्यटन सुरू करावे अशी मागणी होत होती. अखेर आज 1 जुलैपासून पर्यटन सुरू करण्याचा निर्णय ताडोबा व्यवस्थापनाने घेतला. मात्र, यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
ताडोबा उघडले, पण पर्यटकांचा थंड प्रतिसाद; केवळ 22 पर्यटकांनीच केली सफर
पर्यटकांसाठी हाऊसफुल असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज (बुधुवार) मात्र सर्वत्र सामसूम होती. कोरोनातील टाळेबंदीच्या काळात तब्बल 105 बंद असलेले ताडोबा आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
बफर झोनमधील 13 प्रवेशद्वार यासाठी खुले करण्यात आली. यामध्ये आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सकाळच्या सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार उघडले नाही कारण पर्यटकचं आले नाहीत. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जिप्सी आत गेल्या. तत्पूर्वी या वाहनांना निर्जंतुक करण्यात आले. आजच्या सकाळच्या सफारीत 22 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतर जिल्हा, राज्य प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे ताडोबा उघडले तरीही पर्यटकांचा ओघ पूर्ववत होणे अत्यंत कठीण आहे. जेव्हा स्थिती सामान्य होईल तेव्हाच ताडोबाचे पर्यटन नवी उभारी घेऊ शकेल.