चंद्रपूर - कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीने अनेकांचे रोजगार गिळंकृत केले. त्याला धोबी समाजाचा व्यवसाय देखील अपवाद नाही. शहरातील छोटा बाजार जवळ असलेल्या धोबी मोहल्ल्यात एरव्ही खूप गर्दी असायची. सकाळ ते संध्याकाळ येथे कपड्यांचे अविरत काम चालायचे. आता, मात्र या गल्लीत स्मशानशांतता आहे. कोणी तरी नवीन गिऱ्हाईक येईल या भाबड्या आशेने येथील लोक आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसून दिवस घालवत आहेत.
चंद्रपूर शहरात स्वतंत्र असा धोबीघाट नाही. मात्र, छोटा बाजार परिसरात एका छोट्याशा गल्लीत खऱ्या अर्थाने याचे काम चालते. चौधरी कुटुंबाचा येथे वावर आहे. गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून ते येथे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील वंशावळीने आता आपापला व्यवसाय येथे थाटला आहे. या गल्लीत सर्व घरे ही चौधरीचीच आहेत. एरव्ही येथे ग्राहकांची रेलचेल असायची. कपडे धुण्यापासून ड्रायक्लीन करून त्याला कडक प्रेस करण्यापर्यंतचे काम येथे चालायचे. हॉटेल, लॉज, बडे अधिकारी, व्यावसायिक येथून मोठ्या प्रमाणात काम मिळायचे. लग्नाच्या काळात त्यांना जेवण करायला देखील सवड मिळायची नाही. आज ह्याच गल्लीत कोरोनाच्या काळात स्मशानशांतता आहे.
धोबी आणि कपडे इस्त्री करणाऱ्या लोकांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ.... हेही वाचा -शासकीय कार्यालयांमध्ये 'कोरोना-फिवर,' नागरिक वाऱ्यावर; कर्मचारी भीतीच्या छायेत
टाळेबंदीत त्यांचा पारंपरिक व्यवसायच पूर्णपणे बुडाला आहे. आज त्यांच्या घरी कपड्यांचे गठ्ठे पडलेले आहेत. पण हे नव्या ग्राहकांचे नव्हेत तर टाळेबंदी लागण्यापूर्वी ज्यांनी आपले कपडे दिलेत त्या ग्राहकांचे आहेत. यादरम्यान आपले कपडे घेण्यासाठी ते कधी परतलेच नाहीत. मग पैसे तरी कसे मिळणार? ज्यांच्याकडे ग्राहकांची वर्दळ असायची आज त्यांना कपड्याचे काम मिळण्यासाठी लोकांची दारे ठोठावावी लागत आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने लोक कपडे देत नाहीत.
संपूर्ण पिढीच या पारंपरिक व्यवसायात असल्याने दुसरे कामही मिळणे आता शक्य नाही. सध्या या कुटुंबासमोर उदरनिर्वाह करण्याचा मोठा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे. मागील तीन महिन्यांचे जे वाढीव विजबील आले आहे, ते भरण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाही. काही लोक त्यांच्याकडे आले होते. त्यांनी तुम्हाला प्रत्येकी पाच हजार मिळणार असे सांगून गेले. मात्र, पुढे याचे काहीच झाले नाही, असे चंदा शंकर चौधरी सांगतात. तर स्वतंत्र धोबीघाट देण्यासाठी आपण शासन, प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र, पुढे त्याचे काहीच झाले नाही असे जितू चौधरी सांगतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धोबी समाजावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
इस्त्री करणारा व्यवसाय ठप्प...
इस्त्री करणाऱ्या वर्गाचा तर कोरोनाच्या काळात संपूर्ण व्यवसायच ठप्प पडला. गुलाब काजळकर हे मागील 35 वर्षांपासून ह्या व्यवसायात आहेत. आजवर कसेबसे चालू होते मात्र, कोरोनाने दोन वेळच्या जेवणाचे वांधे केलेत. एकदोन कपडे प्रेस करून कसेबसे जगत आहोत, असे ते सांगतात.