चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यात सुगंधीत तंबाखूवर बंदी आहे. मात्र, नेरी येथे एका किराणा दुकानात त्याची सर्रास विक्री होत होती. या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असून १० लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार गुलाब कामडी (वय ५५ रा. नेरी) याला अटक केली आहे.
टाळेबंदीत पानठेले बंद करण्यात आले. तरीसुद्धा सुंगधीत तंबाखूची विक्री सुरू होती. नेरी येथील गुलाब कामडी आपल्या नूतन किराणा स्टोअर्समधून प्रतिबंधित सुगंधीत तंबाखूची सर्रास विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानात विविध कंपन्यांचा १० लाख ९६ हजाराचा सुंगधीत तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.