चंद्रपूर- राजुरा येथील इन्फंट जिझस कॉन्व्हेंट इंग्लिश शाळेच्या आदिवासी वसतिगृहात झालेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांची संख्या आता ७ वर पोहोचली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून आरोपींची संख्या ५ झाली आहे. वसतिगृहात झालेल्या अदिवासी मुलींवरील लैंगिक शोषण प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
माहिती देताना पोलीस आधिकारी
राजुरा येथील इन्फंट जिझस कॉन्व्हेंट इंग्लिश शाळेच्या निवासी आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणात सुरुवातीला २ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले होते. मात्र, आता यामध्ये पीडितांची संख्या वाढली असून ती ७ इतकी झाली आहे. या प्रकरणी आज पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. व्यंकटस्वामी जंगम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता.
या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करत पीडितांच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणी ४ सदस्य असलेल्या समितीच्या निगराणीत तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
हे प्रकरण ६ एप्रिलला समोर आल्यानंतर पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी १६ एप्रिलला करण्यात आली. त्यामुळे प्रशासन याप्रकरणाबाबत गंभीर नाही, असा आरोप पीडितांच्या पालकांनी केला होता. तेव्हा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत वसतिगृह अधीक्षक छबन पचारे, सहाय्यक अधीक्षक नरेंद्र विरुटकर, काळजीवाहक कल्पना ठाकरे आणि लता कन्नाके यांना अटक केली होती. त्यांच्यावर भादंवि कलम ३७६ (अ) (ब) सहकलम ४, बाल लैंगिक छळ ( पोक्सो ) तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या निगराणीत आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल २२ एप्रिलला न्यायालयात सादर करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यांचे एक विशेष पथक नेमले आहे.