चंद्रपूर - चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील बामणी ते तुकुम मार्गावर गेली अनेक दिवसापासून कासवगतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, मोसमी पावसाला सुरूवात झाली असून, या अपूर्ण पुलाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरीकांना या रस्त्यावरुन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
बामणी ते तुकुम पुलाचे काम अपूर्ण, नागरिकांना करावी लागतेय कसरत
बामणी ते तुकुम मार्गावर गेली अनेक दिवसापासून कासवगतीने पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, मौसमी पावसाला सुरूवात झाली असून, या अपूर्ण पुलाची अवस्था बिकट झाली आहे.
चिमूर तालुक्यातील बामणी-तुकुम या मार्गावरील पुलाचा वापर बामणी, तुकुम, नंदाराव मासळ येथील नागरीक व शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. या पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल आणि वाहतूक सुरळीत करता येईल अशी नागरीकांना आशा होती. मात्र, संथ गतीने कंत्राटदारांकडून काम झाल्याने पूल अर्धवटच राहीले. पावसाने अजुन या मार्गाची दुरावस्था झाल्याने शेतकरी व नागरीकांना कसरत करीत मार्गक्रमण करावे लागत आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असून अर्धवट पुलाने नागरीकांना तसेच शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासुन वाचवण्यासाठी बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतातील कामे करता येईल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.