चंद्रपूर - जिल्ह्यातील राजूरा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात सकल मुस्लीम तसेच बहुजन समाजाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी 'मोदी सरकार मुर्दाबाद', अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
चंद्रपुरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात निदर्शने
चंद्रपुरातील राजूरा येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा अन् एनआरसीविरोधात मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सध्या देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तसेच दोन्ही कायदे रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे राजूरा येथे देखील मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा पारित करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील सुफी शहा दर्ग्यापासून मोर्च्याला सुरुवात झाली. त्यानंतर नाका क्रमांक ३, भारत चौक, गांधी चौक नेहरू चौक, उईके चौकातून पंचायत समितीमध्ये मोर्चा नेण्यात आला. याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यामध्ये सैय्यद जाकीर, सय्यद साबीर, एजाज अहेमद, शहानवाज कुरेशी यांच्यासह मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.
हे वाचलं का? - #CAA विरोधी आंदोलन : उत्तर प्रदेश, बंगळुरु अन् लाल किल्ला परिसरात कलम १४४ लागू