चंद्रपूर- स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज अधिकारी, सैनिक आणि भारतीयांना प्रवास करता यावे यासाठी देशात रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात आले होते. या पैकी एक मार्ग म्हणजे नागपूर-नागभिड नॅरोगेज आहे. रेल्वे वाहतूक अजून सुखरूप, सुरळीत व गतिशील करण्याकरिता देशातील सर्व नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात आले. याप्रमाणे इतवारी-नागभिड ब्रॉडगेज प्रकल्पास देखील मंजुरी मिळाल्याने मध्य भारतातील शेवटची नॅरोगेज ट्रेनची धडधड अखेर २५ नोव्हेंबरला थांबणार आहे.
इंग्रजी राजवटीत १९१३ मध्ये नागपूर-नागभिड ट्रेन सुरू करण्यात आली. तेव्हापासून नॅरोगेज ट्रेनच्या धडधडीसोबत चंद्रपूर, गडचिरोली व भंडारातील नागरीकांच्या जीवनाची धडधड जुडली आहे. इतवारी रेल्वे स्टेशनमधून सुटल्यानंतर सोळा थांबे पार करीत साडे चार तासाने नागभिडला ही ट्रेन पोहचत होती. नॅरोगेज मार्ग आणी ट्रेनच्या मर्यादा लक्षात घेता गेली अनेक वर्षांपासून ब्रॉडगेज मार्गाची मागणी नागरीक आणी लोकप्रतिनिधी मार्फत केली जात होती. त्याप्रमाणे २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये यास मान्यता मिळाली. नॅरोगेजचे ब्रॉडगेज रुपांतर करण्याकरीता ९९२ कोटी अपेक्षीत खर्च असून प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर पासून सुरूवात होणार आहे.
मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर, या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रुपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात नागभीड-भिवापूर दुसऱ्या टप्प्यात भिवापूर-उमरेड आणि तिसऱ्या टप्प्यात उमरेड-नागपूर असे विद्युतीकरणासह काम होणार असल्याची माहिती आहे.