चंद्रपूर: हा माल चंद्रपूर शहरातील दारूचा व्यवसाय करणाऱ्या एका मोठ्या व्यापाऱ्याचा असल्याची माहिती आहे. आपल्या टोपण नावाने या व्यवसायात परिचित असलेल्या या दारू विक्रेत्याने जिल्ह्यातील अवैध दारू पुरवठ्याच्या व्यवसायात चांगलाच जम बसवलेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात दारुबंदी असताना हाच व्यावसायिक जिल्ह्यात अवैध दारू तस्करी करायचा. तपासात पोलीस हा माल ज्याचा आहे, त्याचा छडा लावून कारवाई करतोय का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
अशी झाली कारवाई:आजपासून होळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. या काळात दारूची सर्वोच्च मागणी असते. अशावेळे दारूची तस्करी होऊ नये यासाठी पोलीस विभागाने कारवाईची मोहीम राबवने सुरू केले आहे. काल रविवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रकाश बलकी यांच्या नेतृत्वात मूल मार्गावर एक गाडी पकडली. यात साडे पाच लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला. एमएच 34 बीझेड 3157 या चार चाकी वाहनातून दारूची तस्करी केली जात होती. यात वाहनचालक आरोपी अरविंद श्यामराव नेवलकर याला अटक करण्यात आली. गाडीतून देशी दारूच्या 75 पेट्या तर ओसी कंपनीचे 45 नग बंपर सापडले.
काय म्हणाले पोलीस प्रशासन?यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने हा तपास रामनगर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. पोलीस उपनिरीक्षक विनोद गुरूले यांच्याकडे तपासाची सूत्रे आहेत. त्यांच्याशी संपर्क केला असता आपण याचा तपास करीत असून हा माल कुणाचा आहे, तो कुठे जात होता, याची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढे नेमके काय होते, त्या मोठ्या व्यावसायिकापर्यंत कायद्याचे हात पोचू शकतात काय याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
दारुबंदीत अवैध व्यावसायाची चांदी1 एप्रिल 2015 ला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील दारूचा व्यवसाय अचानक ठप्प पडला. मात्र अनेकांसाठी ही संधी होती. यातल्याचपैकी एक हा व्यावसायिक असल्याची माहिती आहे. यासाठी एक वेगळीच यंत्रणा या व्यवसायायिकाने तयार केली. पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग आणि इतरांशी हातमिळवणी करत या व्यवसायिकाने अवैध दारुतस्करी व्यवसायात जम बसवला आणि यात कोट्यवधीची माया जमवली.