चंद्रपूर :जुन्या रेल्वे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्याने रेल्वे प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. जी. जी. राजूरकर आणि विजयकुमार श्रीवास्तव अशी या अधिकाऱ्यांची नावे असून ते इन्स्पेक्टर ऑफ वर्क या पदावर कार्यरत होते. बल्लारपूर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा स्लॅब रविवारी कोसळला होता. यात एका महिला शिक्षिकेचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. तर खासदार धानोरकर यांनी यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती.
प्रकरण : बल्लारपूर रेल्वे स्थानक हे फार जुने आहे. दक्षिण भारताला जोडणारा हा महत्वाचा रेल्वेमार्ग आहे. 50 वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म 1 आणि 2 साठी पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलास जोडून किमान 15 वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्म 3, 4 व 5 साठी नवीन पूल उभारण्यात आला. तीन वर्षांपूर्वी काझीपेठ-बल्लारशा-पुणे ही नवीन साप्ताहिक गाडी सुरू झाली. ही गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार हे निश्चित नसते तसेच इतर ट्रेन ची वाट बघणारे देखील याच पुलावर असतात. हा पूल जुना असल्याने याचे रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यात काही त्रुट्या असल्यास त्याची नोंद घेतली जात होती जेणेकरून त्याची डागडुजी करता येईल.