चंद्रपूर - परराज्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून नोंद करणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक असणार आहे. स्वत:च्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी आपली माहिती लपवू नका, नागरिकांनी देखील प्रशासनाला याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी बस स्थानक परिसरातही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 43 झाली आहे. यापैकी, आतापर्यंत 23 कोरोनाबाधित कोरोना मुक्त झाले आहेत.
सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात दोन कोरोनाबाधित आणि 18 कोरोनाबाधित कोविड केअर सेंटर, वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 20 असून या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात एकूण 21 कंन्टेटमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी 12 कंन्टेटमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे संबंधीत झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंन्टेटमेंट झोन कार्यरत आहेत. आजपर्यंत एकूण 21 कंन्टेटमेंट झोनमधील 48 स्वॅब घेण्यात आलेले आहे. यापैकी 45 नमुने निगेटिव्ह तर 3 नमुने प्रतीक्षेत आहेत.
दोन हजार नमुन्यांची तपासणी -
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये 1 हजार 946 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 43 नमुने पॉझिटिव्ह, 1 हजार 718 नमुने निगेटिव्ह, 167 नमुने प्रतीक्षेत तर अनिर्नयीत 18 आहेत.