महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 1, 2021, 9:10 AM IST

ETV Bharat / state

पोलिसांच्या डोळ्यासमोरच होतेय दारूची सर्रास विक्री; पडोली चौकात सुरू झाले 'बार अँड रेस्टॉरंट'

चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात अगोदर दारू बंदी केलेली आहे. याठिकाणी दारू विक्री आणि खरेदी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, आता चंद्रपूरमध्ये सर्रास दारू विक्री होताना दिसत आहे. याला पोलिसांचा देखील वरदहस्त असल्याचे समोर आले आहे.

Padoli Chowk illegal liquor selling news
पडोली चौक दारू विक्री अवैध दारू विक्री

चंद्रपूर - विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, तरीही येथे अवैध दारूविक्रीची पाळेमुळे कशी घट्ट रोवली गेली आहेत, याचा 'ईटीव्ही भारत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून पर्दाफाश झाला आहे. पडोली पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही पावलांच्या अंतरावर असलेल्या चौकात 'दस का बिस' सुरू आहे. या चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येक व्यक्तीला हे 'दस का बिस' करणारे प्रतिनिधी विचारणा करतात. मात्र, हे प्रतिनिधी कुठल्या सिनेमाचे तिकिटे नाही तर, चक्क दारू ब्लॅकमध्ये विकतात. केवळ विक्रीच नाही तर तळीरामांना येथे बसण्याची, थंड पिण्याचे पाणी आणि चखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. थोडक्यात काय तर दारूबंदीच्या जिल्ह्यात त्यांनी थेट 'बार अँड रेस्टॉरंट' उघडले आहेत. याचसाठी या अस्थायी बारचे प्रतिनिधी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला या सुविधेची माहिती देऊन आकर्षित करतात. देशी-विदेशी दारूचे रेट सांगतात. विशेष म्हणजे यापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या पडोली पोलीस ठाण्याकडून यावर कुठलीही कारवाई होत नाही.

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांनी अवैध दारू विक्रीचे स्टिंग ऑपरेशन केले

पडोली चौक हा अत्यंत वर्दळीचा आणि व्यस्त चौक समजला जातो. कारण हे ठिकाण चंद्रपूर शहराच्या हद्दीला अगदी लागून आहे. हा चौक नागपूर-चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा महामार्गाला जोडलेला आहे. त्यामुळे येथे लोकांची मोठी वर्दळ असते. अस्थायी लोकांचा येथे घोळकाच असतो. सोबत बाजूला लागलेला एमआयडीसीचा विस्तीर्ण परिसर आहे. वेकोलीची ऊर्जाग्राम वसाहत आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या हे ठिकाण मोठे आणि महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अगोदरच दारूबंदी झालेली आहे. त्यामुळे दामदुपटीने दारू खरेदी करणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. याचाच फायदा घेऊन या चौकात काही लोकांनी व्यवसाय थाटले आहे. बाहेर नाष्टा सेंटरचे बोर्ड लावले आहेत तर, आत पडदा टाकून दारू पिण्याची व्यवस्था तळीरामांसाठी करण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे लोक विचारणा करतात. आपल्याला दारू हवी आहे का? कुठली हवीय देशी की विदेशी? असे विचारत हे विक्रते आपल्या अड्ड्यावर तळीरामांना नेतात. या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर पडोली पोलीस ठाणे आहे. याच चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. पोलीस कर्मचारी देखील ये-जा करत असतात. हा संपूर्ण अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. या संपूर्ण यंत्रणेचा पर्दाफाश ईटीव्ही भारतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून झाला आहे. खुद्द दारू विक्रेत्यांशी चर्चा करताना पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या प्रतिमेला तडा जात आहे. वरिष्ठांनी यावर लक्ष देऊन असल्या प्रकारावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.

ठाणेदार कासार यांची उडवाउडवीची उत्तरे -

ही बाब पडोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कासार यांच्या निदर्शनास आणून दिली. सुरुवातीला त्यांनी असला काही प्रकार सुरू असल्याचे मान्यच केले नाही. असला प्रकार सुरू असल्याच्या बाबीवर ठाम असल्याचे पाहून त्यांनी मग उडवाउडवीची उत्तरे दिली. आम्ही यावर खूप कारवाया केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, या पडोली चौकात सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यावर किती कारवाया केल्या याचा तपशील त्यांनी दिला नाही. अशी माहिती हवी असेल तर उद्या पोलीस ठाण्यात पुन्हा या असा दम त्यांनी दिला. अवैध दारू फक्त पडोलीत सुरू आहे काय? असा उलट सवाल देखील त्यांनी केला.

अरेच्चा तपशील न घेताच केली अचूक कारवाई -

असला प्रकार पडोलीच्या चौकात काही(दुकानांची नावे सांगितली नाहीत) नाष्टा सेंटरमध्ये सुरू आहे, ही बाब ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांनी पडोलीचे ठाणेदार कासार यांच्या निदर्शनास आणून दिली. आश्चर्याची बाब म्हणचे अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी नेमक्या त्याच ठिकाणी जाऊन कारवाई करून ते नाश्ता सेंटर बंद केले. केवळ याच ठिकाणी दारू विक्री केली जाते हे त्यांनी अचूक ओळखले हे विशेष. ती कारवाईची केवळ रंगीत तालीम होती. मात्र, काही दिवसांतच हा खेळ पुन्हा सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवकुमारच्या विक्षिप्तपणाची कर्मचाऱ्यांना असे धास्ती

ABOUT THE AUTHOR

...view details