चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावाची ओळख जिल्ह्यातील संतनगरी अशी आहे. या गावाला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोंड आणि मराठ्यांची या गावावर सत्ता होती. या दोन्ही साम्राज्यांनी आपापल्या कारकिर्दीत गावात अनेक मंदीरांची निर्मिती केली. ही मंदिरे आजही गावात उभी आहेत. मराठ्यांनंतर गावात ब्रिटिशांची सत्ता आली. ब्रिटिशांनी गावात अनेक सूधारणा केल्या. गावात शाळा, पोलीस स्टेशनची निर्मिती केली. मात्र, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ढाबा गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कधीकाळी 'धाबा सोन्याचा गाभा' अशी ओळख असलेले हे गाव मागासलेल्या गावांचा यादीत गेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यावर गोंड राजांची सत्ता होती. गोंड राज्यात येणारा महत्त्वाचा परगणा म्हणून धाबा गावाची नोंद होती. धाबा परिसराला लागुनच आंध्र प्रदेश(आजचा तेलंगाणा) राज्याची सीमा असल्याने गोंड, मराठे आणि ब्रिटिशांनी या भागाकडे विशेष लक्ष दिले होते. गोंडराजे व मराठ्यांनी बांधलेली मंदिरे आजही धाबा गावाच्या गत वैभवाची साक्ष देत उभी आहेत.
मराठ्यांचा सत्तेनंतर येथे ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांनी गावाचा चेहरा मोहरा बदलला. चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा धाबा गावात सुरू झाली होती. या शाळेची इमारत शंभर वर्षानंतर आजही उभी आहे. येथे भव्य असे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन होते. आजही त्याच जागेवर नवे पोलीस स्टेशन उभे आहे. धाबा परिसरातील वनक्षेत्र घनदाट होते. त्यामुळे या जंगलात शिकार करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी येत असत. त्याच्या नोंदी आजही येथे सापडतात. ब्रिटिशकाळात धाबा गावाने वैभवाचे उच्च शिखर गाठले होते. याच काळात 'धाबा सोन्याचा गाभा' अशी उपाधी गावाला लाभली.