चिमूर (चंद्रपूर) - शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही गाई, म्हशी, बैल पाळणे कमी झाले आहे. शिवाय जे शेतकरी जनावरे पाळतात ते शेणापासून खत बनवितात. मात्र चिमूर तालुक्यातील गोदेंडा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गो शाळेत सुरू करण्यात आलेल्या 'गो कास्ट' प्रकल्पामुळे शेणास 'अच्छे दिन' आले आहे. याठिकाणी दोन रुपये किलो या दराने शेण खरेदी केले जाणार आहे.
'गो कास्ट' प्रकल्प -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी तथा समस्त गुरुदेव भक्तांचे प्रेरणास्थान म्हणजे साधनाभुमी गोंदेडा होय. गोदेंडा येथील वास्तव्य साधनेने पुनीत अशा गुंफा मंदिर परिसरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गो शाळा आहे. जंगलतोड वाढल्याने जंगल कमी झाले. तसेच कठोर वन कायद्यांमुळे जळाऊ लाकडे मिळणेही कठीण झाले आहे. चराई क्षेत्र कमी झाल्याने तसेच शेतातील यंत्र, साहित्य व ट्रॅक्टरमुळे अनेकांनी गुरे पाळणे सोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या गो शाळेत शेणापासून जळाऊ लांब आकाराच्या गोवऱ्या बनविणारा 'गो कास्ट' प्रकल्प सुरू करण्यात आला असून याठिकाणी शेणाची आवश्यकता आहे.
शेण विक्रीसाठी आणण्याचे आवाहन -
जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचे महत्त्व फक्त शेण खतासाठी होत होते. शेणापासून काही नगदी फायदा होत नाही. वृक्षतोड, वन विभागाचे कडक कायदे यामुळे जळाऊ लाकूड मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी सुद्धा लाकडे मिळत नाही. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे सुद्धा नुकसान होत आहे. तेव्हा 'गो कास्ट' ने शेणापासून लांब गोवरी करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाकरिता कच्चा माल म्हणून भरपूर शेण लागणार आहे. शेण जमा करून 2 रुपये किलो प्रमाणे शेतकऱ्यांकडून शेण घेतल्यास आर्थिक फायदा होईल. त्यामुळे ग्रामीण भागात गुरेढोरे पालन करणे बंद होणार नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाकरिता 2 रुपये किलो याप्रमाणे गो शाळेत शेण विक्रीसाठी आणण्याचे आवाहन 'गो शाळा' अध्यक्ष कमल असावा, सचिव प्रवीण दडमल यांनी केले आहे.