चंद्रपूर - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र, अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांचा मुक्त संचार होत आहे. संचारबंदीच्या दुसऱ्याच दिवशी हे चित्र पाहायला मिळणे अत्यंत निराशाजनक आहे. त्यामुळे येणारे 19 दिवस कसे असणार, याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
हेही वाचा...कोरोनाचा फटका : स्वगृही परतण्यासाठी मजुराचा पायी प्रवास, दोन दिवसांनी पोहोचला घरी
कोरोना विषाणूने मानवी जीवनाच्या अस्तित्वाचे आव्हान उभे केले आहे. देशाला यापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 तारखेपासून येणाऱ्या 21 दिवसापर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. म्हणजेच सामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात संचारबंदी अगोदरच सुरु करण्यात आली होती. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आज (गुरुवार) या बंदोबस्तात शिथीलता आल्याचे पहायला मिळाले.