चंद्रपूर - गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभाग नेहमीच अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरत असतो. अशातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास नेत्र तपासणीसाठी आलेल्या वृद्ध महिलेला बाहेर हाकलून लावल्याने डाॅक्टर विरुद्ध रुग्ण असा खडाजंगी सामना रंगला होता. या प्रकाराने शेकडो रुग्ण संतापले. त्यामुळे सदर प्रकरण आपल्याला भारी पडणार या भीतीने महिला डॉक्टर ढसाढसा रडल्या.
डोळे तपासणीसाठी आज अनेक महिला रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. महिला डॉक्टर हे तपासणीचे काम करत होत्या. तपासणी सुरू असताना एका रुग्ण महिलेला काही अक्षरांची ओळख सांगता आली नाही. या मुद्द्यावरुन महिला रूग्णाने असभ्य बोलल्याचा ठपका ठेवत डॉक्टरने या रूग्णाला हात धरून बाहेर काढले. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेरील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.