महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' स्टिंग ऑपरेशन : चेस्ट सिटी स्कॅनच्या नावाने डॉक्टरांचा 'धंदा'; रुग्णांकडून तब्बल तीनपटीने पैसे वसूल

कोरोना काळात चंद्रपुरातील रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांकडून चेस्ट सिटी स्कॅनच्या नावाखाली रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. यात डॉक्टर सिटी स्कॅनसाठी रुग्णांकडून तब्बल तीन पट पैसै घेत आहेत. आधी ही चाचणी अडीच ते तीन हजार रुपयांमध्ये केली जात होती. आता या चाचणीसाठी रुग्णांना तब्बल ८ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 16, 2020, 7:19 AM IST

Updated : Sep 16, 2020, 5:05 PM IST

चंद्रपूर - कोरोनासारख्या आणीबाणीच्या काळात डॉक्टरांवर रुग्णांना प्रामाणिक सेवा देण्याची जबाबदारी असताना काही डॉक्टरांनी मात्र यात आपला 'धंदा' सुरू करण्याची संधी शोधली आहे, असेच काहीसे चित्र चंद्रपुरात आहे. जेवढी सामान्य रुग्णांची लूट केली जात आहे आहे, त्यानुसार 'धंदा' हा उल्लेख तेवढाच समर्पक आहे. 'ईटीव्ही भारत'च्या स्टिंग ऑपरेशनने याचे बिंग फुटले. शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांकडून चेस्ट सिटी स्कॅनच्या नावाने तब्बल तीन पट पैसे उकळले जात आहेत. एका तपासणीसाठी आठ हजार इतका हा दर आहे. पूर्वी हाच दर हा अडीच ते तीन हजारांच्या घरात होता. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी सिटी स्कॅनचा दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश दिले असताना चंद्रपुरात मात्र हा दर प्रत्येक डॉक्टर आपल्या मर्जीनुसार लावत आहेत आणि जिल्हा प्रशासन हातावर हात ठेवून सामान्य रुग्णाची लूट निमूटपणे बघत आहे.

चेस्ट सिटी स्कॅनच्या नावाने डॉक्टरांचा धंदा...
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा सामूहीक संसर्ग वाढला आहे. दररोज रूग्णांची दोनशे ते तीनशे संख्येने वाढ होत आहे. कोरोनाच्या संसर्गा फुफ्फुसापर्यंत पोहचतो. त्यामुळे रूग्णांना फुफ्फुसाचे सीटी स्कॅन करण्याचे डॉक्टर सुचवितात. त्यामुळे रेडीओलॉजिस्टकडे सध्या पाय ठेवायला जागा नाही. मात्र येथे छातीचे सीटी स्कॅन करायला येणाऱ्या रूग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. कोरोनाच्या आधी आणि आताच्या सीटी स्कॅनच्या दरात तब्बल तीन पटीने वाढ केली आहे. शहरात तीन जणांकडे सीटी स्कॅनची व्यवस्था आहे. या तिघांनीही आपल्या दरात वाढ केली आहे. तिघांचेही दर वेगवेगळे आहे. जिल्ह्यात फक्त डॉ. रवी अल्लूरवार, डॉ. अनिल माडूरवार आणि डॉ. अजय मेहरा यांच्याकडे सीटीस्कॅनची व्यवस्था आहे. या तिघांचेही चाचणी केंद्रे चंद्रपूर शहरात आहे. सामान्य ते अतिसामान्य वर्गातील रुग्ण पूर्वी जितके दर होते, त्यानुसार अडीच ते तीन हजार खिशात घेऊन येतात. जेव्हा याच तपासणीची किंमत पाच ते आठ हजार इतकी सांगण्यात येते. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. एखाद्या सामान्य रुग्णाने तीनपटीने वाढ केलेली आठ हजार रुपये आणावी तरी कुठून हा प्रश्नच आहे. मात्र, डॉक्टरांना त्यांची कीव नाही. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर शहरातील या सिटी स्कॅन केंद्रांचे स्टिंग करण्यात आले आणि सत्य परिस्थिती बाहेर आली.

डॉ. अनिल माडुरवार इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहे. डॉक्टरांवरील अन्याय आणि वैद्यकीय क्षेत्रातील चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु डॉ. माडुरवार यांनीच याला तिलांजली दिली. त्यांनीही सीटीस्कॅनच्या दरात सहा हजार रूपयांपर्यत वाढ केली. जटपुरा परिसरात डॉ. रवि अल्लूरवार यांचे केंद्र आहे. ते रूग्णांकडून चक्क आठ हजार रूपये सीटी स्कॅनचे घेतात. डॉ. अजय मेहरा रूग्णांकडून पाच हजार रूपये वसूल करीत आहे. एकाच चाचणीसाठी शहरात तिघेजण वेगवेगळे दर आकारत आहे. मात्र यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलेही कायदेशीर तरतूद नाही, असे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी सांगितले. कुणी तक्रार केली तर कारवाई करू. डॉक्टरांनी एकत्र बसून दर ठेवावे, असा सल्ला देत त्यांनी आपली जबाबदारी झटकली. विशेषत: म्हणजे एचआरसीटीची चाचणीसाठी देशभरातील कोणत्याही शहरात अडीच ते तीन हजार पाचशेच्यावर शुल्क आकारले जात नाही. मात्र चंद्रपुर अपवाद ठरला आहे. कोरोनाच्या संकटाला संधीत रूपांतरीत करण्याचा गोरखधंदा या डॉक्टरांनी सुरू केला. हे कोरोना रूग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया जनमानसात उमटत आहे.

डॉक्टरांची टाळाटाळ -
याबाबत या सर्व रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांशी संपर्क करण्यात आला. डॉ. अल्लुरवार यांनी आपल्या असिस्टंटकडे फोन देऊन आपली जबाबदारी झटकली. त्यांना अधिकृत प्रतिक्रियेसाठी विचारणा केली असता त्यांनी सहा तासांनी ती देतो असे सांगितले मात्र, यानंतर त्यांनी थेट नंबर ब्लॉक करून आपली जबाबदारी झटकली. डॉ. माडूरवार यांनी आपला आधीचा दर हा साडेपाच हजार होता, कोरोनानंतर कुणाला संसर्ग होऊ नये यासाठीच्या उपकरनांसाठी आपण पाचशे रुपये आगाऊचे लावत असल्याचे सांगितले. डॉ. मेहरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, एकंदर हा प्रकार लक्षात आल्यावर हे डॉक्टर आपली जबाबदारी झटकण्यात धन्यता मानत आहेत.

Last Updated : Sep 16, 2020, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details