महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'स्वाध्याय' उपक्रमात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल; झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुकर

स्वाध्याय उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे वाचन आणि त्यावर आधारित प्रश्नावलीच्या माध्यमातून शिक्षण होत आहे.

By

Published : Dec 24, 2020, 7:01 PM IST

Updated : Dec 24, 2020, 9:45 PM IST

chandrapur-district-ranks-first-in-the-state-in-swadhyay-initiative
'स्वाध्याय' उपक्रमात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल; झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुकर

चंद्रपूर -कोरोना काळात खंड पडलेल्या शिक्षणाला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने चेतना आणली आहे. विद्यार्थ्यांचे वाचन आणि सोबतच त्यावर आधारित प्रश्नावली व्हाट्सअपच्या माध्यमातून राज्यभर दिली जात आहे. चंद्रपूर जिल्हा दुर्गम भागात समजला जात असला तरी या जिल्ह्याने या 'स्वाध्याय' नामक उपक्रमात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

'स्वाध्याय' उपक्रमात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल; झेडपीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले सुकर

गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभर शालेय शिक्षण या ना त्या कारणाने रखडले आहे. कोरोना काळात हे शिक्षण पूर्णपणे ठप्प होते. अनलॉक प्रक्रियेनंतर या शिक्षणात थोडा सुरळीतपणा येऊ लागला आहे. मात्र, पहिली ते दहावी या इयत्तांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी भक्कम प्रयत्नांची गरज होती. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने नेमका हाच विचार डोळ्यापुढे ठेवत राज्यभर 'स्वाध्याय' नामक व्हाट्सअप आधारित प्रश्नमंजुषा तयार केली. ज्या विद्यार्थ्यांना घरी व्हाट्सअप च्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा सोडविणे शक्य आहे, त्या सर्वांना यात सामावून घेणे शिक्षकांनी शक्य केले. ताज्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीच्या सुमारे 57 हजार विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा उपक्रमात सहभाग घेतला असून राज्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. दर शनिवारी आणि रविवारी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून ही प्रश्नमंजुषा दिली जाते. यात चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी सहभागाचा विक्रमच केला आहे

शाळा बंद त्यामुळे वाचन-अभ्यास देखील बंद. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर सामाजिक दुरतेचे पालन करत गाडा पुढे नेणे गरजेचे होते. इथेच स्वाध्याय सफल ठरला. एखादी बहुपर्यायी प्रश्नमंजुषा सोडवायची म्हणजे तो संपुर्ण धडा वाचणे गरजेचे होते. या कुतूहलाने भाषा-गणित आणि विज्ञान या विषयांचा अभ्यास कोरोना काळातही शक्य झालाय. शिक्षक आणि विद्यार्थी या स्वाध्याय उपक्रमाने समाधानी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम भागात विद्यार्थी व्हाट्सएपवरील या उपक्रमात कसे सहभागी होतील हे एक आव्हान होते. मात्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षकांच्या नियोजनामुळे हे शिखर गाठता आले आहे.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती -

चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 2,506 शाळा आहेत, त्यात 15 हजार 600 शिक्षक कार्यरत आहेत. त्यात पहिली ते दहावीचे एकूण 3 लाख 76 हजार विद्यार्थ्यांची नोंद आहे. या उपक्रमात एकूण 57 हजार विद्यार्थी थेट जुळले आहेत. ही संख्या राज्यातील एकूण जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या आठवड्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे.

अशी आहे प्रक्रिया -

या स्वाध्याय उपक्रमात सामील होण्यासाठी आधी मोबाईलवर लिंक पाठविली जाते. त्यावर क्लिक करून आपले नाव, शाळेचे नाव, वर्ग आणि तालुका अशी माहिती भरावी लागते. यानंतर विद्यार्थ्याची नोंदणी होते. एकाच मोबाईलवर अशा शंभर विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकते. म्हणजे एकाच परिसरातील ज्या विद्यार्थ्यांच्या घरी मोबाइल नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत सोयीचे आहे. आधी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सांगितला जातो. त्यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याची चाचणी घेतली जाते. यात दहा प्रश्न असतात ज्याचे उत्तर चार पैकी एक पर्याय निवडून देता येते. याप्रमाणे क्रमाक्रमाने हे प्रश्न येतात. सर्व प्रश्न संपल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका पाठवली जाते. ज्यात किती उत्तरे बरोबर आणि किती चुकले याची माहिती विद्यार्थ्याला मिळते.

Last Updated : Dec 24, 2020, 9:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details