महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूर : रामाळा तलाव सफाई प्रकल्पाचा फज्जा, उद्घाटनाच्या दिवशीच बोट बुडाली

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याची नामुष्की मनपा प्रशासनावर ओढवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने ते बचावले आहेत.

By

Published : Jul 25, 2019, 7:50 PM IST

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली.

चंद्रपूर - शहरातील रामाळा तलाव सफाई मोहिमेची उद्घाटनाआधीच फजिती झाली आहे. तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याची मनपा प्रशासनावर नामुष्की ओढवली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या कार्यक्रमात उपस्थित न झाल्याने ते बचावले आहेत.

जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य नाविन्यता संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रामाळा तलाव आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ केला जाणार होता. या प्रकल्पाचे उद्घाटन आज(दि. २५ जुलै) दुपारी अडीच वाजता होणार होते. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवणार होते.

रामाळा तलावाच्या सफाईसाठी आणलेली 'केवट' नावाची बोट उद्घाटनाच्या वेळी तलावात बुडाली.

मुनगंटीवार यांचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व आयुक्त संजय काकडे यांनी वेळोवेळी संबंधित प्रकल्पासाठी बैठकी घेतल्या होत्या. तलाव स्वच्छता व शुद्धीकरणाचे विविध उपाय यादरम्यान तपासण्यात आल्यानंतर १ महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर 'केवट' ही बोट मागवण्यात आली. 'ओमीओम क्लीनटेक' या कंपनीने ही बोट तयार केली असून, पाणी सफाई तसेच शुद्धीकरण असे विविध काम करणारी ही भारतातील पहिलीच बोट आहे. या एक महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील पाण्यावरील तरंगणारा तसेच खोलात असलेला कचरा साफ करण्याचे काम बोटीद्वारे करण्यात येणार आहे.

या अभिनव प्रयोगाची मुहूर्तमेढ आज अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार होती. मात्र, ऐनवेळी ह्या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उद्घाटनाआधीच बोट बुडाली. याची माहिती मिळाल्याने मुनगंटीवार यांनी उद्घाटनस्थळी येण्याचे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details