महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर उद्या दाऊद हा काँग्रेसचा अध्यक्ष होईल - उद्धव ठाकरे

काँग्रेसच्या महाआघाडीवर टीका करताना ती महाभेसळ असल्याची उद्धव ठाकरेंनी टीका केली. आमच्याकडे नेतृत्व आहे. विरोधकांकडे कोणते नेतृत्व आहे ते सांगावे असे त्यांनी आव्हानही दिले. देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा देखील देशद्रोहच आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे

By

Published : Apr 10, 2019, 5:05 AM IST

मुंबई -काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देशद्रोहाचे कलम काढायला निघाले आहेत. तसे झाल्यास उद्या दाऊद हा काँग्रेसचा अध्यक्ष होईल, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर केली. ते दक्षिण मुंबई मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या रेस कोर्स येथील प्रचार सभेत बोलत होते.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशद्रोहाचे कलम काढण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर खरपूस टीका केली. राहुल गांधींनी एका भाषणात १२४ (अ) कलम काढू असे सांगितले आहे. या कलमानुसार देशाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई होते. ही कारवाईच टाळली तर देशात अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होईल, अशी उद्धव ठाकरेंनी भीती व्यक्त केली. देशाचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करायचे नाहीत तर त्यांना दूध पाजायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींना पंतप्रधान करायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


काँग्रेसची महाआघाडी म्हणजे महाभेसळ-उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या महाआघाडीवर टीका करताना ती महाभेसळ असल्याची उद्धव ठाकरेंनी टीका केली. आमच्याकडे नेतृत्व आहे. विरोधकांकडे कोणते नेतृत्व आहे ते सांगावे असे त्यांनी आव्हानही यावेळी दिले. देशद्रोहाचे कलम काढून टाकणे, हा देखील देशद्रोहच आहे, अशा शब्दात काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका केली. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. भवितव्य कुणाच्या हातात सुरक्षित राहणार याची ही निवडणूक आहे. ज्यांच्या हातात देशाचे भविष्य सुरक्षित आहे, त्यांनाच आम्ही समर्थन देत असल्याचे सांगत त्यांनी युतीचे समर्थन केले.


रेस कोर्स मुंबईकरांसाठी खुला झाला पाहिजे- उद्धव ठाकरे
मुंबईच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांचे कौतूक केले. अनेक प्रश्नांचा सावंत यांनी संसदेत पाठपुरावा केला आहे. मुंबईचा पूर्व किनारा आणि रेस कोर्सही मुंबईकरांसाठी खुला झाला पाहिजे. या रेसकोर्सवर थीम पार्क बनवण्याची आमची इच्छा अजूनही कायम असल्याचे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंना म्हणाले भोक पडलेला फुगा
राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यादिवशीच्या घेतलेल्या सभेत राहुल गांधी यांचे समर्थन केले होते. यावर बोलताना राज ठाकरेंचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी त्यांना सगळे भोक पडलेले फुगे असल्याचे म्हटले. आघाडीने कुणाचीही मदत घ्यावी आता काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मिलिंद देवरा यांना सांभाळून बोलण्याचा सूचक इशारा-
दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलींद देवरा यांचे वडील दिवंगत मुरली देवरा यांना मुंबईचे महापौर अशी ओळख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दिली होती. अशी आठवण करून देत मिलिंद देवरा यांनी सांभाळून बोला, असा सूचक इशारा दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details