मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच सरकारकडून सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू आहे. या आठवड्यात पहिल्यांदा ७ नंतर १३ तर आज ३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच, तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने गेल्या आठवड्यात १३ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. दरम्यान आजही बदल्यांचे सत्र सुरुच असून सरकारने ३ अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या केल्या आहेत.
मुख्य सचिव पदाच्या रेसमध्ये असणाऱ्या १९८३ च्या बॅचचे सनदी अधिकारी तथा सध्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांना राज्य आर्थिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य आर्थिक महामंडाच्या व्यवस्थापकीय संचालक निधी पांडे यांची पाचव्या वित्त आयोगाच्या सदस्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची वने आणि महसूल विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये वने आणि महसूल विभागात अप्पर मुख्य सचिव असलेल्या मेधा गाडगीळ या सर्वात जेष्ठ सनदी अधिकारी आहेत. तसेच काँग्रेस नेते आमदार अनंत गाडगीळ यांच्या त्या पत्नी आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या निवृत्तीनंतर सेवा ज्येष्ठतेत मेधा गाडगीळ मुख्य सचिव पदाच्या रेसमध्ये होत्या. मात्र त्यांना डावलून अनेक वेळा डेप्युटेशनवर असलेले वरिष्ठ अधिकारी डी. के. जैन यांना पसंती देण्यात आली होती. या नंतर गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त करत थेट रजेवर जाणे पसंत केले होते.