बुलडाणा - जिल्ह्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंड येथून आलेल्या दोन जणांचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
नवीन नियमानुसार पुन्हा तपासले स्वाब
जिल्ह्यातील दोन व्यक्ती हे इंग्लंडवरून परत आले. भारतात दाखल होताच त्यांची मुंबई विमानतळावर 21 डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यानंतर ते खामगाव येथे 22 डिसेंबर रोजी आपल्या घरी पोहोचले. मात्र, ब्रिटेनमध्ये आलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर बाहेर देशातून आलेल्या सर्व नागरिकांच्या चाचण्या केल्या जात असल्याने या दोघांचेही स्वॅब घेण्यात आले. यात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोघांनाही रुग्णालयात अलगीकृत करण्यात आले आहे. या दोघांना नेमका कोणता स्ट्रेन आहे, हे तपासण्यासाठी त्यांचे स्वॅब आज पुण्याला पाठविण्यात आले आहेत.