बुलडाणा - मंडप डेकोरेशनच्या साहित्याच्या ठोक विक्रीसाठी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सुलतानपूरातील व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत आहेत. व्यवसाय बंद झाल्यामुळे साहित्याची विक्री न झाल्याने सहा ते सात कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे व्यावसायिकांसह या क्षेत्रात काम करणाऱ्या 300 ते 400 जवळपास कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सुलतान येथील 75 वर्षीय नारायण जुमडे यांनी 35 वर्षाआधी संतकृपा मंडप गृहउधोग शिलाई या छोट्याश्या दुकानाच्या माध्यमातून शिलाई करून नवीन मंडप तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. पाहता-पाहता सुलतानपूर गावांत अनेकांनी मंडप शिलाईच्या व्यवसायाला सुरुवात केली. जवळपास 200 कारागीर नारायण जुमडेंच्या हाताखाली तयार झालेत. सध्या नारायण आणि त्यांचा मुलगा वसंत जुमडे हे ठोक पद्धतीने मंडपाचे साहित्य विक्री केंद्र चालवत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील 10 ते 12 मंडप डेकोरेशन सजावटीचा व्यवसाय करणारे व्यवसायिक सुल्तानपूर येथून ठोक भावात नवीन शिवलेले कापडी मंडप, पडदे खरेदी करतात.
दरवर्षी सहा ते सात कोटींची उलाढाल सुल्तानपूर येथे होत असते. यातून मंडप शिवणारे व ठोक भावात विक्री करणाऱ्या व्यवसायिकांची देखील चांगली कमाई होत असते. यासाठी कापडी मंडप ठोक भावात विक्री करणारे व्यवसायिक बँकेतून कर्ज काढून, व्यापाऱ्यांकडून पैसे उसने घेऊन मंडप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करतात. यावर्षी देखील नारायण जुमडे यांनी बैंकेकडून 20 ते 25 लाखांचे कर्ज घेऊन आणि व्यापाऱ्यांकडून 25 ते 30 लाखांचा माल घेवून नवीन कापडी मंडपाचे साहित्य शिवून तयार केले. मात्र जेव्हा लग्न सराईला सुरवात झाली तेव्हाच कोरोनामुळे सर्व ठप्प झाले. यामुळे मागच्या तीन महिन्यापासून शिवलेले कापडी मंडप जशाच्या तसे दुकानात ठेवलेले आहेत. लाखोंचं कर्ज घेऊन त्यांनी माल तयार केला. ज्यांनी ऑर्डर देऊन ऍडव्हान्स दिला त्यांच्यासाठी साहित्य तयार असूनही व्यवसायीक ते साहित्य घेऊन जात नाहीत. त्यामूळे हे साहित्य दुकानात पडून आहे. येथील कारागीरही काम सूरू होण्याच्या आशेने रोज दुकानात येऊन बसतात. कोरोना संपेल आणी काम सुरू होईल यांना वाटते. अशी अवस्था या फक्त इथल्या कामगारांची नसून 200 च्या जवळपास सुल्तानपूरातील कामगारांची आहे.