बुलडाणा - शेतकरी कर्जमाफी संदर्भात मंत्री बच्चू कडू यांच्या विधानाला आपले समर्थन असून बच्चू कडू यांना विरोध करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यासारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलडाण्यातील पत्रकार परिषदेत केली. स्वाभिमानीच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आणि पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दोन लाखांच्या कर्जमाफीबाबत महाविकास आघाडीचे मंत्री बच्चू कडू यांनी या कर्जमाफीचा फायदा बँकांना होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांना आमचे समर्थन आहे. कारण सुरुवातीला पीक कर्ज घेताना योजनेतून 365 दिवसासाठी 6 टक्के व्याजाने कर्ज मिळते. 365 दिवसात कर्ज भरल्या गेले नाही तर पुढच्या वर्षापासून 12 ते 13 टक्के दराने व्याज आकारले जाते. आता 4 वर्षांपासून शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. यामुळे 2 लाखांच्या कर्ज योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. असे असताना मंत्री अब्दुल सत्तार मात्र बच्चू कडू यांना राजीनामा देण्याची भाषा करत आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासारख्या उथळ मंत्र्यांवर आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, ही आमची भूमिका असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले.