बुलडाणा -कृषी कायदा मागे घेण्यासाठी दिल्लीत दीड महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पूर्ण समर्थन म्हणून गोरसेनेच्या वतीने आज गुरुवारी 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
21 ते 25 जानेवारीपर्यंत साखळी उपोषण
कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात गोरसेनेच्यावतीने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज गुरुवारी 21 जानेवारी रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व अमरावती विभागीय अध्यक्ष रामचंद चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून 21 ते 25 जानेवारीपर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
'चर्चा-बैठका होऊनही कोणताही ठोस निर्णय नाही'
दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून या शेतकरी आंदोलनात जवळपास ८० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या कायद्यांसंदर्भात सरकारसोबत अनेक वेळा चर्चा-बैठका होऊनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तसेच या शेतकरी आंदोलनाला सरकार तसेच न्यायालयाने दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हे आंदोलन होत असल्याचे सांगण्यात आले.