बुलडाणा- कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवही साधेपणाने व शासकीय नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा, असे आवाहन बुलडाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी नवदुर्गा सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दरवर्षी शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात १४ सार्वजनिक मंडळ तर ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २४ मंडळ नवरात्रौत्सव साजरा करतात. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गाच्या आजारामुळे शासनाच्या निर्देशानुसार शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात पण लोक सहभागाशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सोमवारी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक बोलविण्यात आली होती.
हेही वाचा -यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी - चंद्रकांत पाटील
कोरोना संसर्गाचा उपद्रव कायम आहे. त्यामुळे सर्वांनीच शासनाच्या गाईडलाईनचे पालन करावे, प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी ओळखून नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा, सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करून गर्दी होणार नाही याची मंडळांनी दक्षता घ्यावी. तसेच मंडळांनी बंदिस्त जागेतच नवरात्रोत्सव साजरा करावा, साउंड सिस्टिम, सार्वजनिक मिरवणूक व यात्रांना परवानगी नसून समाजकंटकांच्या अफवेला बळी पडू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असेही जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया यावेळी म्हणाले. बैठकीला शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, डीवायएसपी दिलीप तळवी, ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर, उपमुख्याधिकारी स्वप्नील लघाने, नायब तहसीलदार पवार यांच्यासह समाजसेवक, नगर पालिका कर्मचारी व सार्वजनिक नवदुर्गा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती.