बुलडाणा -खामगाव तालुक्यातील वाडी या खेड्यातून येणाऱ्या प्रसाद ठाकरे या तरुणाने पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत त्याने यश संपादन केले. विशेष बाब म्हणजे प्रसादला बारावीमध्ये अवघे 51 टक्के गुण मिळाले होते. म्हणून त्याने 3 वर्षे शेतीही केली. मात्र, कर्जाचा डोंगर झाल्याने त्याने न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. प्रसादच्या जिद्द आणि चिकाटीचे कुटुंबीय व गावकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
हेही वाचा -#१५YearsofDhoni : पहिल्याच सामन्यात झाला होता शून्यावर बाद, नंतर ठरला 'सर्वोत्तम कर्णधार'
प्रसाद ठाकरे हा 27 वर्षीय तरुण सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा आहे. त्याने मराठी माध्यमाच्या नगरपरिषदेच्या शाळेतून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर खामगावमध्ये एलएलबी आणि एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले. प्रसादने दिवाणी न्यायाधिश पदाची परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार नियोजन करुन इतरत्र वेळ खर्ची न लावता अथक परिश्रम घेत पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश संपदान केले. एकुण 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादने लेखी पेपरमध्ये 109 आणि मुलाखतीमध्ये 32 गुण मिळवले. परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास 15 हजार विद्यार्थी बसले होते. मात्र, अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले.