बुलडाणा- भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत घिर्णी येथील एकाचा जागीच मृत्यू झाला. ईश्वरसिंह रमेशसिंह बघेले (३५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता मलकापूर-जामनेर राज्य महामार्गावर जांभूळधाबा जवळ घडली.
बुलडाण्यात कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता मलकापूर-जामनेर राज्य महामार्गावर जांभूळधाबा जवळ घडली.
ईश्वरसिंह बघेले ( रा. घिर्णी ता. मलकापूर) हे मंगळवारी सकाळी दुचाकीने (एमएच २८ वाय ५९२८) भुसावळ येथे नातेवाइकांकडे जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला फोर्ड कारने (एमएच १९ सीयु २५१२) जांभूळधाबा जवळील गिट्टी खदानजवळ जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की बघेले हे १० ते १५ फूट दूर फेकले गेले व कारही तीन ते चार पलट्या खाऊन शेतात जाऊन पडली.
या अपघातात इश्वरसिंह बघेले यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, मनसे (परीवहन) जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, भाराकाँ शहराध्यक्ष राजू पाटील, तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, घर्णीचे संरपंच उमरावसिंह राजपूत यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अपघातानंतर कारचालक पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी मनोज भरतसिंह बघेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.