महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात अडकलेल्या 507 मजुरांची घराकडे वाटचाल; भुसावळ येथून विशेष श्रमजीवी रेल्वे लखनौकडे रवाना

उत्तर प्रदेश राज्यातील स्थलांतरीत 507 मजुरांना प्रशासनाने बुधवारी मोफत त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या रेल्वे स्थानकावर पोहोचवले. येथून विशेष श्रमजीवी रेल्वे लखनौसाठी सायंकाळी 6 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातील मजुरांसह बुलडाणा जिल्ह्यात अडकलेले 507 मजूर लखनौसाठी रवाना झाले. सदर रेल्वे लखनौ येथे गुरुवारी सकाळी 8 पर्यंत पोहोचणार आहे.

जिल्ह्यात अडकलेल्या 507 मजुरांची घराकडे वाटचाल; भुसावळ येथून विशेष श्रमजीवी रेल्वेने लखनौकडे रवाना

By

Published : May 7, 2020, 8:07 AM IST

बुलडाणा : कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने देशभर 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले. त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणीही करण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे राज्यात परप्रांतीय मजूर अडकून पडले. राज्य शासनाने अशा स्थलांतरित व अडकून पडलेल्या मजुरांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी निवास, भोजनाची मोफत व्यवस्था केली. राज्यातील विविध भागातून पायीच आपल्या घराची वाट धरणाऱ्या मजुरांना जिल्ह्यात आले असताना प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रांमध्ये त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्यासाठी अन्न, निवासासह समुपदेशन, आरोग्य तपासणी व मनोरंजनाची व्यवस्थाही करण्यात आली.

उत्तर प्रदेश राज्यातील अशाच स्थलांतरित 507 मजुरांना प्रशासनाने बुधवारी मोफत त्यांच्या राज्यात पोहोचविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या रेल्वे स्थानकावर पोहोचवले. भुसावळपर्यंत जिल्ह्यातील विविध निवारा केंद्रात असलेल्या मजुरांना विविध वाहनांची व्यवस्था करून प्रशासनाने पोहोचवले. भुसावळ रेल्वे स्थानकातून विशेष श्रमजीवी रेल्वे लखनौसाठी सायंकाळी 6 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये जळगाव, धुळे आदी जिल्ह्यातील मजुरांसह बुलडाणा जिल्ह्यात अडकलेले 507 मजूर लखनौसाठी रवाना झाले. सदर रेल्वे लखनौ येथे गुरुवारी सकाळी 8 पर्यंत पोहोचणार आहे.

प्रशासनाने निवारा केंद्रामध्ये केलेल्या व्यवस्थेबद्दल मजुरांनी प्रशासनाने धन्यवाद मानले. मजुरांना केवळ स्थानकापर्यंत आणून प्रशासन थांबले नाही, तर मजुरांना एक वेळच्या जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, चहाची व्यवस्थाही प्रशासनाने केली. यावेळी भुसावळ स्थानकावर जिल्ह्यातील महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रेल्वे सुटण्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मजुरांना टाळ्या वाजवून आनंदाने भावपूर्ण निरोप दिला. यावेळी मजूरही भारावून गेले होते. अशाप्रकारे जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यापासून निवारा केंद्रात असलेल्या मजुरांची पावले शासनाच्या सहकार्यामुळे त्यांच्या घराकडे वळाली आहेत. लवकरच त्यांना त्यांचे घरटे जवळ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details