बुलढाणा: खाजगी शाळेवरील या दोन्ही शिक्षकांची कसून चौकशी सुरू केली. पेपरफूटी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रितसर अटक करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या या संशयितांची नावे, शेख शकील शेख मुनाफ व अंकुश पृथ्वीराज चव्हाण राहणार सावरगाव तेली, तालुका लोणार येथील आहेत. या दोघांना रात्री अटक करण्यात आले आहे. पेपरफूटी प्रकरणातील आरोपींची आजपर्यंतची संख्या ७ झाली आहे. तर आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हाट्सअप ग्रुपवर पेपर: यासाठी काही जणांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर शिक्षक पेपर टाकत होते. विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा ते बारा हजार रुपये घेण्यात आले आहे असा संशय आहे. पुढील तपास याच प्रकरणात साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार काळे हे करत आहेत. १२ वी चा गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना 3 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडली होती. या संपूर्ण पेपर फुटीचे पडसाद सुरू असलेल्या राज्याच्या अधिवेशनात देखील उमटले होते.